कोल्हापूर - खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्याने हा हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पेरणीनंतर शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची उगवण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.
सोयाबीन क्षेत्राची समरजीतसिंह घाटगेंनी केली पाहणी यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी घाटगे यांना सांगितल्या. निकृष्ट सोयाबीन बियाणे, कर्जमाफी, पिककर्ज व रासायनिक खतांचा तुटवडा या बाबतीत तक्रारी मांडल्या. समरजितसिंह घाटगेंनी शेतकऱ्यांना दिलासा देत, त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव सोबत असल्याची ग्वाही दिली.
उगवण न झालेल्या पीक क्षेत्राचे कृषी विभागामार्फत पंचनामे करून खराब बियाणांच्या बदली दुसरे बियाणे किंवा त्याची रक्कम देण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना बिल व इतर बाबी विक्रेत्यांनी दिलेल्याच नाहीत. त्यामुळे असे शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न घाटगे यांनी उपस्थित केला. बियाणे कंपनांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे आता हंगामही लांबण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सोसावे लागणार आहे, असे समरजितसिंह घाटगे म्हणाले.
सध्या जिल्ह्यात युरिया खताची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे युरिया खतासाठी लिंकिंगसह ज्यादा दराचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित यंत्रणेशी बोलून युरिया खताच्या सुरळीत पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही घाटगे यांनी शेतक-यांना दिली.