कोल्हापूर - सलून व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सर्व नाभिक बांधवांनी दसरा चौकात मूक आंदोलन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने सलून व्यावसायिक उपस्थित होते. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. याच ठिकाणी निष्काळजीपणा दिसल्याने येणाऱ्या काळात दुकाने सुरू झाल्यानंतर कितपत सूचनांचे पालन करणार, यावर नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.
'सोशल डिस्टन्स'चा फज्जा : कोल्हापूरात नाभिक समाज रस्त्यावर; मूक आंदोलनमार्फत निषेध - beauty parlors in kolhapur
सलून व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सर्व नाभिक बांधवांनी दसरा चौकात मूक आंदोलन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने सलून व्यावसायिक उपस्थित होते. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सहकार्य करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून नाभिक समाजाने दुकाने बंद ठेवली. सध्या 'अनलॉक-१.०' या टप्प्यात अनेक व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली नाहीय. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. दोन महिने दुकाने बंद ठेवल्यानंतर आता उपासमारीची वेळ आल्याचे नाभिक समाजाने सांगितले. धंदा बंद झाल्याने आर्थिक फटका बसला असून अडचणींत वाढ झाली आहे.
त्यामुळे सलून व्यवसायांना परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी मूक आंदोलन पुकारले. यावेळी शासनाच्या निषेधार्थ फलकबाजी करण्यात आली. यासोबच पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करणारे फलक देखील झळकवण्यात आले. काळ्या फिती बांधून शहरातील दसरा चौकात सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने दुकाने सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा; अन्यथा 15 जूनपासून कायद्याविरोधात जाऊन आम्ही व्यवसाय सुरू करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच गरज पडल्यास जेल भरो आंदोलन करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.