कोल्हापूर- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी 2019 ला शेतकरी संकटात असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या, अशी मागणी केली होती. तीच मागणी आता पवार यांनी पूर्ण करावी, अशी मागणी रयत क्राती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर 22 ऑक्टोबरला जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खोत म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकारने ज्या ठिकाणी 25 टक्के पेक्षा जास्त पीक वाया गेले आहे. तिथे पंचनामा करण्यापेक्षा थेट मदत द्यावे, असे देखील खोत यांनी म्हटले आहे. केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता तत्काळ त्यांच्या खात्यावर टाकावेत, असे देखील खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत म्हणाले, व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी साठविलेल्या कांद्यावर कोणी अधिकारी छापा टाकायला आले तर त्याचा दांडक्याने समाचार घ्या, असा सल्ला शेतकऱ्यांना रयतक्रांती शेतकरी संघटनेचे खोत यांनी दिला आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये एक नात आहे. त्यामुळे व्यापाऱ्याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शेतकऱ्यांला फटका बसतो, असे वक्तव्य देखील सदाभाऊ खोत यांनी केले आहे.