कोल्हापूर - 'कोल्हापुरातील पूर परिस्थिती आटोक्यात आहे. आणखीन दोन दिवस पाऊस असाच पडला तर परिस्थिती बिघडू शकते. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आणखी एनडीआरएफच्या टीम कोल्हापुरात पाचारण केल्या जातील', अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात जोरात पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
'नागरिकांनी धीर सोडू नये'
'कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात आहे. आपत्ती दलही सज्ज आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती बिकट होऊ शकते. मात्र, नागरिकांनी धीर सोडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये', असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, 'पूरस्थिती गंभीर बनली तर आणखी एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात येईल', अशी माहितीही यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिली.