कोल्हापूर- नुसते बोलून काय उपयोग आहे? अविश्वास ठराव आणा, मग तुम्हाला महाविकास आघाडीचे सरकार किती भक्कम आहे हे कळेल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सरकारमध्ये बेबंदशाही सुरू असून त्यांच्यात आपापसातच समन्वय नाही, असे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना अविश्वास ठराव आणा आणि आमच्या तिघांची आघाडी किती भक्कम आहे, हे पाहा असे आव्हान दिले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
अविश्वास ठराव आणा, तिघांची आघाडी किती भक्कम ते समजेल - हसन मुश्रीफ - हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटलांवर टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर अविश्वास ठराव आणा आणि आमच्या तिघांची आघाडी किती भक्कम आहे, हे पाहा असे आव्हान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. मात्र, आजूबाजूच्या राज्यात इंधन दर कमी असताना महाराष्ट्रातच जास्त का? असा मुश्रीफ यांना सवाल केल्यानंतर याबाबत मी माहिती घेतलेली नाही, पण केंद्र सरकारनेच यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.
एमपीएससीची परीक्षा कोरोनाचे कारण सांगत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षानेही सरकारवर टीकास्त्र सोडले. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू असून त्यांच्यात आपापसातच समन्वय नाही. शिवाय इतर घटक पक्षसुद्धा वेगवेगळी भूमिका मांडत आहेत, हे सरकार लबाड आहे, अशा पद्धतीची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी सरकार किती भक्कम आहे हे पाहायचा असेल तर अविश्वास ठराव आणा, असे आव्हान दिले आहे.
आजूबाजूच्या राज्यात इंधन दर कमी मग महाराष्ट्रात जास्त का?
तिकडे पेट्रोलचे दर 100 पार झाले आहेत. त्याचप्रमाणे डिझेल आणि गॅसचे दर सुद्धा गगनाला भिडले असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप शांत कसे काय बसले आहेत? असा प्रश्न केल्यानंतर मुश्रीफांनी इंधन दरवाढीविरोधात आमची सातत्याने आंदोलने सुरू आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभावच आहे, कोणाला भीक घालायची नाही. त्यामुळे याकडे सुद्धा त्यांचे लक्ष नाहीये. आता जनतेनेच केंद्रातील भाजप सरकार पडण्याबाबत ठरवण्याची गरज असल्याचे म्हणाले. दरम्यान, आजूबाजूच्या राज्यात इंधन दर कमी असताना महाराष्ट्रातच जास्त का? असा मुश्रीफ यांना सवाल केल्यानंतर याबाबत मी माहिती घेतलेली नाही, पण केंद्र सरकारनेच यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे असे म्हणत वेळ मारून नेली.