कोल्हापूर - विधानपरिषदेसाठी पाठविण्यात येणारी 12 नावं बाजूला ठेवायचं ठरलं असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनीच याबाबत बोलले असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला असून असे झाले तर ते पूर्णपणे असंविधानिक असेल, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी हा आरोप केला असून याबाबत अधिक माहितीसाठी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देताना विधान परिषदेसाठीच्या 12 सदस्यांची यादी आज राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी नवी चर्चा समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी विधानपरिषदेसाठी पाठविण्यात येणाऱ्या नावांबाबत एका नेत्याच्या घरी चर्चा सुरू होती. त्या चर्चेदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पाठविण्यात येणारी नावं बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले होते. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी हे खळबळजनक आरोप केले आहेत.
विधानपरिषदेवर कोणाची होऊ शकते निवड -
भारताच्या घटनेत अशी तरतूद आहे, की जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या धकाधकीत उतरत नाहीत, मात्र त्यांच्याकडे एखाद्या क्षेत्रातील विशेष ज्ञान आहे, त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्यकारभार करताना व्हावा अशा अनेक क्षेत्रातील १२ व्यक्तींची राज्यपाल विधानपरिषदेवर नियुक्ती करू शकतात. कला, साहित्य, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात.
राज्यपाल व राज्य सरकारचे संबंध -
महाराष्ट्र विधान परिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून सहसा नाकारली जात नाहीत. मात्र सध्याचे राज्यपाल कोश्यारी व महाविकास आघाडी सरकारचे ताणलेले संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांच्या नावांना राज्यपाल सहजासहजी मंजुरी देतील याची शक्यता खूपच कमी आहे.
हसन मुश्रीफांचा गोप्यस्फोट -
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या १२ जागांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी फेटाळतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे यांना खासगीत सांगितल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याने राजकारणात खळबळ माजली आहे. मुश्रीफांनी या नावांच्या मंजुरीसाठी संघर्ष करण्याचा इरादा बोलून दाखवल्याने महाआघाडी सरकार व राजभवनामध्ये ठिणगी पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद नियक्तिसाठीही राज्यपालांनी आडकाठी आणली होती. ते प्रकरणही लॉकडाऊन काळात प्रचंड गाजले होते.