कोल्हापूर - बुधवारी (दि. 30 मार्च) होणारा दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-2 हा पेपर आधीच फुटल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर जोरदार पसरल्याने कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे खळबळ ( Rumors of SSC Paper Leak ) उडाली. काही उत्साही सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करत शाळेत गोंधळही घातला. मात्र, चौकशीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असलेले पेपर आज होणाऱ्या परीक्षेचे नाहीत, असे समोर आले आहे. त्यामुळे या चुकीच्या माहितीमुळे प्रशासनासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. असे चुकीचे मॅसेज व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Rumors of SSC Paper Leak : जयसिंगपुरात पेपर फुटल्याची अफवा, प्रशासन अन् विद्यार्थ्यांमध्ये खळबळ - Jaisinghpur Police
बुधवारी (दि. 30 मार्च) होणारा दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-2 हा पेपर फुटल्याची अफवा सोशल मीडियावर जोरदार पसरल्याने कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे ( Rumors of SSC Paper Leak ) खळबळ उडाली. काही उत्साही सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करत शाळेत गोंधळही घातला. मात्र, चौकशीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असलेले पेपर आज होणाऱ्या परीक्षेचे नाहीत, असे समोर आले आहे.
दहावीच्या पहिल्या पेपर पासून पेपर फुटीची चर्चा होती सुरू -दरम्यान, दहावीचे परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पेपर पासूनच पेपर फुटीची चर्चा जयसिंगपूर येथे सुरू होती. मात्र, आज बुधवारी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान-2 हा पेपर आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. 29 मार्च) फुटल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्याही हाताला हे बोगस पेपर लागले. त्यामुळे त्यांनी चौकशी शिवाय संताप व्यक्त करत पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेत गोंधळ घातला. घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पेपर असणाऱ्या शाळेत धाव घेत सामाजिक कार्यकर्त्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हाती घेतले. शिवाय चौकशी केली असता आज सुरू असलेला पेपर आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या पेपरमध्ये फरक दिसून आला, त्याचे सांकेतिक क्रमांकही वेगवेगळे आहेत. त्यामुळे पेपर फुटल्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले. या चुकीच्या माहितीमुळे प्रशासन तसेच विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.