जयसिंगपूर ( कोल्हापूर) -शहरातील कोल्हापूर - सांगली महामार्गावरील पायोस हॉस्पिटलमध्ये गावठी बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, या बॉम्बसदृश्य वस्तूची पाहाणी केली. ही वस्तू बॉम्ब नसून, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे साहित्य इथे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जयसिंगपूरमध्ये सांगली - कोल्हापूर मार्गावर डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल परिसरात गुरुवारपासून बेवारस अवस्थेत प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडले होते. हे साहित्य रुग्णांच्या नातेवाईकांचे असेल म्हणून सुरक्षा रक्षकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र रविवारी सकाळी याच रुग्णालयातील एक कर्मचारी भरत पाटील यांना त्या पोत्यातून टीक-टीक असा आवाज आला. तेव्हा त्यांनी हे पोते तपासले असता, पोत्यामध्ये त्यांना प्लॅस्टिकचे पाईप, वायर आणि एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आढळून आले. तर पोत्यामधून बाहेर काढलेली एक केबल देखील आढळली. त्यांनी याची माहिती डॉ. सतिश पाटील यांना दिली.