कोल्हापूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट अजूनही 10 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील नियम कायम ठेवण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आज दुपारी नवीन आदेश काढून माहिती दिली.
हेही वाचा -केवळ बिंदू चौकात नव्हे, राज्यात कुठेही चर्चेसाठी तयार; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
यापूर्वी जे नियम लागू केले तेच नियम कायम राहणार
जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नियमांमध्ये शिथिलता देणे योग्य नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हंटले. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यामध्ये यापूर्वी जे नियम लागू करण्यात आले तेच नियम पुढील आदेश येई पर्यंत लागू राहणार असल्याचे आज दुपारी नवीन आदेश काढून स्पष्ट केले. यामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी असणार असून इतर अस्थापना बंदच राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेपर्यंत परवानगी असणार आहे.
अनेकांचे नवीन नियमावलीकडे होते लक्ष
उद्या 28 जूनपासून जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता येईल, अशी शक्यता होती. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी आणि चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल झाले नाही तर आस्थापना सुरू करू, अशा पद्धतीचे निवेदन दिले होते. मात्र, जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाहता तो 10 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे, निर्बंधांमध्ये शिथिलता देणे योग्य नसल्याचे म्हणत कोल्हापूर जिल्ह्यातील नियमावली जैसे थे ठेवण्यात आली.
हेही वाचा -राधानगरी धरणावर थाटात शाहू जयंती साजरी; समरजितसिंह घाटगे म्हणाले....