कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतलं 'अंबाबाई'चं दर्शन कोल्हापूर Mohan Bhagwat In Kolhapur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (17 डिसेंबर) त्यांनी सांगलीत सभा घेतली. यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापुरात दाखल झाले होते. दरम्यान, आज (18 डिसेंबर) सकाळी सात वाजेच्या सुमारास पारंपरिक वेशात त्यांचं कोल्हापुरातील करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात आगमन झालं. मंदिरात जाऊन त्यांनी अंबाबाईची पूजा-अर्चा करुन दर्शन घेतलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव प्रशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी भागवत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. अंबाबाईच्या दर्शनानंतर मोहन भागवत रत्नागिरीच्या दिशेनं रवाना झाले.
भाविकांसाठी मंदिर बंद : मोहन भागवत मंदिरात येणार असल्यानं सर्वसामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता. राज्याबाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती. सुमारे अर्धा तास मोहन भागवत मंदिरात होते. करवीरनिवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन मोहन भागवत मंदिराबाहेर पडल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.
मोठा पोलीस बंदोबस्त : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सकाळीच दर्शनाला येणार असल्यानं कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. यामुळं अंबाबाई मंदिर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळालं.
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा रद्द :राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 60 व्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार होते. याशिवाय त्यांच्या उपस्थितीमध्ये कंदलगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, राज्यपाल कार्यालयाकडून सोमवारी सकाळी, जिल्हा प्रशासनाला रमेश बैस यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा रद्द झाल्याचं कळविण्यात आलं.
हेही वाचा -
- Mohan Bhagwat on Hinduism : हमास आणि इस्त्रायलसारख्या मुद्द्यावरून देशात कधीही भांडण झालं नाही, कारण...सरसंघचालक भागवत
- Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांचा लखनऊ दौरा, आगामी लोकसभेची ठरणार रणनीती?
- Mohan Bhagwat On intellectual Kshatriya : 'या' आशेने जग भारताकडे पाहते, मात्र भारताला सध्या बौद्धिक क्षत्रियांची गरज : सरसंघचालक