कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचे प्रमाण पाहता या जमिनींचा पोत सुधारण्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. यासाठी यापुर्वीच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनासाठी अर्थसहाय्य देणे बाबतची घोषणा केली होती. क्षारपड जमीन सुधारणा योजनांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य व्हावे, याबाबत आपण स्वतः आग्रही होतो. त्यानुसार शिरोळमधल्या क्षारपड जमीनीच्या सर्वेक्षणासाठी 60 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
मागणीला यश
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीची सद्यस्थिती, क्षारपड जमिनीचे असणारे एकूण क्षेत्र, आणि या जमिनींची सुधारणा करण्यासाठी येणारा खर्च याबाबतची विस्तृत माहिती वेळोवेळी आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन दिली होती. या जमिनीचे सर्वेक्षण व्हावे व जमीन सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी 12 डिसेंबर 2020 रोजी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या विभागाकडून शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनी बाबतचा अहवाल मागवला होता. याचाच भाग म्हणून आयुक्त पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींच्या अहवालाच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील 27 गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या रुपये 60 लाखाच्या निधीला शासन मान्यता मिळाली आहे. शिवाय लवकरच सर्वेक्षणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल, अशी माहितीही राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
'या' 27 गावांमधील क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण होणार