कोल्हापूर -येथील कोव्हिड सेंटरमध्ये रोबोटिक कार रुग्णांना सेवा देत आहे. विजन चॅरिटेबल ट्रस्टने उभ्या केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये ही कार कार्यरत असून रुग्णांना औषध पुरवण्यापासून नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणत आहे. कोल्हापूर सायबर क्राईम विभागात काम करणाऱ्या अजय सावंत यांनी ही कार तयार केली आहे. याद्वारे आपला रुग्ण कसा आहे याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना घरबसल्या मिळणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या सेंटरमधून उपचार घेऊन गेलेल्या कोरोना रुग्णांनी या वर्षी हे सेंटर उभे करण्यासाठी पुढाकार घेतलाय.
सुमारे दीडशे रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर -
'व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट'च्यावतीने गेल्या वर्षी कोल्हापूरातील सायबर कॉलेज येथे जवळपास 150 रुग्णांसाठी अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारण्यात आले होते. काही 5-6 अपवाद वगळता जवळपास 1 हजार 200 हुन अधिक रुग्णांना या कोव्हिड सेंटरचा आधार मिळाला होता. त्यातून सर्वजण ठणठणीत बरे होऊन घरी गेले होते. त्यांच्या या सेंटरला कोल्हापूरातील मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगीता निंबाळकर यांचा सुद्धा या कोव्हिड सेंटरला मोठा हातभार लागला आहे. आपले स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून त्या या ठिकाणी मोफत उपचार देत आहेत. त्यामुळे यावर्षी सुद्धा आपल्या हातून सामाजिक सेवा घडावी या हेतूने व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे यांनी ठरवले होते. त्यानुसार पुन्हा एकदा 150 बेडचे अद्ययावत कोव्हिड सेंटर सुरू झाले असून. यावर्षी दाखल झालेले पहिलेच 15 रुग्ण कोरोनावर मात करून आपल्या घरी परत गेले आहेत.
अनोख्या शक्कलीतून बनवली रोबोटिक कार -
यावर्षी या कोव्हिड सेंटर मध्ये मनुष्यबळ कमी लागावे यासाठी अनोखी शक्कल लढवून एक रोबोटिक कार बनविण्यात आली आहे. ही कार रुग्णांना औषध पुरवण्यापासून नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणत आहे. अनेकजण कोव्हिड सेंटरमध्ये आपले नातेवाईक कसे आहेत. याबाबत चौकशी करण्यासाठी येत असतात. मात्र आता त्याच नातेवाईकांना आपल्या रुग्णांशी घरबसल्या व्हिडिओद्वारे संवाद साधता येणार आहे.