कोल्हापूर :जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणाही हाय अलर्टवर आहे. पंचगंगा नदीची सध्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू असून पंचगंगेच्या पाण्याची पातळी ३५ फूट ६ इंचांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून यंत्रणा सतर्क झाली आहे.
NDRF ची 1 तुकडी कोल्हापुरात दाखल : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांसह NDRF ची 1 तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 71 टक्के भरले आहे. धरणाच्या पॉवरहाऊसमधून 1 हजार 350 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात येत आहे.
पंचगंगेची पाणीपातळी 35 फूटावर : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी 35 फूट 6 इंचांवर पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला पाच दिवस ऑरेंज अलर्ट :गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने गेले दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला होता. मात्र पुढील पाच दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय घाट माथ्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.