कोल्हापूर - सारथी संस्थेच्या स्वायत्तेच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केले आहे. सारथी संस्थेला अधिक भक्कम करण्यासाठी अधिकारी वर्गाबरोबरच मराठा समाजासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, अशा प्रतिनिधींना सुद्धा संस्थेवर घेण्याची गरज असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
सारथी संस्थेला स्वायत्तता बहाल; संभाजीराजेंनी केले निर्णयाचे स्वागत - सारथी स्वायत्तता बातमी
सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता बहाल केली आहे. या निर्णयाचे संभाजीराजेंनी स्वागत केले आहे.
2019 मध्ये सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यानंतर मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, तर यासाठी संघर्ष अटळ असल्याबाबत मराठा क्रांती मोर्चाने म्हटले होते. विशेष म्हणजे संभाजीराजेंनी सारथी समोर उपोषण करत वेळोवेळी आवाज उठवला होता. समाजातील हा रोष लक्षात घेत सरकारने सारथी संस्थेला पुन्हा एकदा स्वायत्तता बहाल केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सर्वच समाजातून स्वागत केले जात आहे. संभाजीराजेंनी सुद्धा याचे स्वागत केले असून अधिकारी वर्गाबरोबरच मराठा समाजासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, अशा प्रतिनिधींना सुद्धा संस्थेवर घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात उद्धभवलेल्या पुरस्थितीचा पाहणी दौरा सुद्धा खासदार संभाजीराजे करणार आहेत. उद्यापासून या दौऱ्याला सुरवात होणार असून पंढरपूर येथून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यानंतर सरकार समोर वस्तुस्थिती मांडणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.