कोल्हापूर -कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून दोन ते साडेतीन लाखांपर्यंत बिले आकारली जात आहेत. या बिलांची पावती केवळ 90 हजार रुपयांची देण्याचा प्रकार पेठ वडगावमधील कुडाळकर हॉस्पिटल येथे घडत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश पेमेंट करा, जर नसतील तर तुमच्या रुग्णांना घेऊन जा, किंवा ऑक्सिजन पुरवठा बंद करतो, अशी धमकी हॉस्पिटलने दिल्याचा आरोपही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्यादाचे बिलं परत करावे, अशी मागणी करत जिल्हा प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईकांसह शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, हॉस्पिटलवर केलेल आरोप हे बिनबुडाचे आहेत. बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया कुडाळकर हॉस्पिटलचे डॉ. सुरज कुडाळकर यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया देताना रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर हॉस्पिटलवर बिनबुडाचे आरोप, बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई- डॉ. कुडाळकर
राष्ट्रीय मानांकान मिळवलेले वडगावमधील कुडाळकर हे पहिले हॉस्पिटल आहे. कोरोनाकाळात सर्वात प्रथम कोविड सेंटर सुरू करण्यास आम्ही तयारी दर्शवली. रुग्णांची सेवा करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र काही लोकांकडून दिशाभूल करून हॉस्पिटलवर आरोप केले जात आहेत. कोरोना रुग्णांचे बिल नगरपालिकेच्या लेखापाल यांच्याकडून तपासून ऑडिट केले जाते. कोविड काळात डॉक्टरांचे मनोबल वाढवण्याऐवजी आरोप करून आमचे खच्चीकरण सुरू आहे. त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करून दाद मागू, असे कुडाळकर हॉस्पिटलचे डॉ. सुरज कुडाळकर यांनी सांगितले.
हेही वाचा -आरक्षण देण्यात कोण कमी पडले, याची संभाजीराजेंना पूर्ण कल्पना- भाजप नेते गिरीश महाजन
हॉस्पिटलवर रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप -
पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप काही कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांनी केला आहे. कुडाळकर हॉस्पिटलकडून ज्यादा बिलाची आकारणी केली जात आहे. तसेच लाखो रुपये भरून त्याची पावती केवळ 90 हजार रुपयांची दिली जात आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटलकडून जादा बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच नियंत्रण समितीकडे दिल्या असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र, त्याला अद्याप कोणतीही दाद देत नसल्याचे या नातेवाईकांनी सांगितले आहे. जर लवकरात लवकर रुग्णांच्या नातेवाईकांना ज्यादा आकारलेले बिल परत दिले नाही, तसेच रुग्णालयाकडून होणारी पिळवणूक थांबवावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा उपनगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
पन्हाळा तालुक्यातील नावेली येथील जयसिंग गणपती जाधव हे रुग्ण कुडाळकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होते. त्यांच्याकडून एकूण तीन लाख 70 हजार रुपये हॉस्पिटलने जमा करून घेतले. तसेच ही रक्कम जमा करण्यास विलंब झाल्यास रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा बंद करू अशी धमकी हॉस्पिटलकडून देण्यात येत होती, असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. एकूण अदा केलेल्या रक्कमेची पावती मागितली असता त्यांना 90 हजार रुपये इतक्या रक्कमेची पावती देण्यात आली, असे रुग्णांचे नातेवाईक संतोष शिंदे यांनी सांगितले.
वडगावमधील हमिदा पटेल या दहा दिवसांपासून कुडाळकर हॉस्पिटल येथे उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान येणाऱ्या खर्चासाठी त्यांना घरातील सहा तोळे सोने विकावे लागले. तसेच भरमसाठ पैशाची मागणी करत, भरमसाठ औषधं देखील सांगण्यात आले. पटेल यांची प्रकृती उत्तम झाल्यानंतर त्यांनी औषधं पुन्हा मेडिकलमध्ये देऊन पैशाची मागणी केली. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने ती औषधं तुम्हाला देता येणार नाहीत असे सांगितले. मात्र, हॉस्पिटलने औषध पुन्हा मेडिकलमध्ये देऊन पैसे घेतले असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
हेही वाचा -झारखंडच्या हजारीबागमध्ये फरशीवर उकळतंय पाणी!