कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या पायतील बेड्या काढा, अशी वर्षानुवर्षे मागणी होत होती. ती मागणी मान्य होत असेल आणि आता स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असेल तर आम्ही त्याचे स्वागत का करू नये? आता जे आंदोलन सुरू आहे हे काय देशभराचे आंदोलन नाही. हे केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील केवळ दलालांचे आंदोलन आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली.
कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या माध्यमातून 'किसान आत्मनिर्भर यात्रेचे' आयोजन करण्यात आले आहे. याबाबतच माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंदोलन करत असलेले दलाल काँग्रेस अन् डाव्या विचारसरणीचे
दिल्लीमध्ये आंदोलनास बसलेले सर्व दलाल हे काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे आहेत. ज्यांना या देशांमध्ये काहीही नवनिर्मिती होत असेल तर ते नको असून त्याला केवळ विरोधच करायचा, अशी ही मंडळी आहे. खुली अर्थव्यवस्था आली तेव्हाही हे विरोध करत होते. मात्र, आम्ही पुढे येऊन त्याचे समर्थन केले होते. पण, चांगल काही होत असेल तर नेहमी त्यांना विरोधच करायचा असतो अशी ही मंडळी असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले.