कोल्हापूर :राजू शेट्टी यांना आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आलेली आहे. सोमवारी रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांचेवतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यावतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे.
बारसू प्रकल्पास तीव्र विरोध : बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली आहे. त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी ऊपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे. तर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मारहाण झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत, चलो रत्नागिरीचा नारा ही दिला होता.