कोल्हापूर - संपूर्ण राज्यभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज हजारो रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे त्याचा राज्यभरात तुटवडा भासत आहे. याचाच फायदा घेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी कोल्हापुरात सक्रिय झाली आहे. त्यातील दोघांना 11 इंजेक्शनसह पोलिसांनी अटक केले आहे. योगीराज राजकुमार वाघमारे आणि पराग विजयकुमार पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, यामध्ये आणखी कोण सहभागी आहे, तसेच याचा सूत्रधार कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
एका इंजेक्शनची किमंत 18 हजार
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दराने विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह अन्न व औषध प्रशासन विभागाकडील दोन औषध निरीक्षक अधिकारी यांच्या पथकाने सापळा रचला. कोल्हापुरातील सासणे ग्राऊंड येथील 'मणुमाया' या इमारतीच्या तळमजल्यामध्ये संशयित आरोपी योगीराज राजकुमार वाघमारे (वय 24, रा. समर्थ नगर करुल रोड, मोहोळ, जिल्हा सोलापूर, सध्या रा. न्यू शाहूपुरी कोल्हापूर) हा आढळून आला. त्याच्याकडे 3 रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा सापडली. त्यावेळी त्याच्याकडे औषधे कोणाकडून घेतली याबाबत चौकशी केली असता, त्याने पराग विजयकुमार पाटील (वय 26, रा. गणेश कॉलनी कसबा बावडा, कोल्हापूर) याच्याकडून घेत असल्याचे सांगून, तो थोड्या वेळात आणखीन रेमडेसिवीर औषधांच्या बाटल्या घेऊन येणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा सापळा लावून त्याचा साथीदार पराग विजयकुमार पाटील यालाही काही वेळाने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडेही 8 इंजेक्शन मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून 11 इंजेक्शन जप्त केले असून, दोघांना अटक केली आहे. या इंजेक्शनची विक्री प्रत्येकी 18 हजार रुपयांना होणार असल्याचे चौकशीत समोर आले आहे.