कोल्हापूर : कोल्हापुरातील 40 वर्षांपासून चप्पल शिवण्याचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या महादेव गणपती गाडेकर यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. जगाचा निरोप घेण्याआधी आपली मोठी बहीण शालिनी बाबू सातपुते हिला बोलावून घेऊन महादेव यांनी कोल्हापुरातील शेळके पुलावर असलेला आपला छोट्या व्यवसाय सांभाळण्याचं वचन घेतलं होतं. भावांनं अंतिम क्षणी घेतलेला शब्द प्राणपणाने जपत बहिण शालिनी सातपुते या गेल्या चार वर्षांपासून भावाचा हा व्यवसाय स्वतः सांभाळत आहेत. दिवसभर रस्त्याकडेला बसून स्वतःचे चहापाणी होईल इतकी कमाई होते. मात्र भावावर असलेल्या प्रेमापोटी त्याच्या पश्चात हा व्यवसाय बहिण सांभाळत आहे.
अशी होते दिवसाची सुरुवात : कोल्हापुरातील ओढ्यावरील गणपती परिसरात असलेल्या शेळके पुलावरील चार बाय चारच्या केबिनमध्ये भरगच्च असलेल्या चप्पल आणि इतर साहित्यामध्ये भाऊ महादेव गाडेकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. सकाळी सात वाजता शालिनी सातपुते या सुभाष नगरातील घरातून बाहेर पडून शेळके पुलावर असलेल्या केबिनपर्यंत चालत येतात. सकाळी दुकान उघडले की दुकानात असलेल्या दिवंगत भावाच्या फोटोला नमस्कार करून फुल अर्पण करून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना, चप्पल बूट पॉलिश करायला येणाऱ्या ग्राहकांना भावाचं दुकान मी सांभाळत असल्याचं सांगतात. भावाच्या फोटोकडे बघून त्या भावुक झाल्याचं चित्र इथं दररोज येणाऱ्या अनेकांनी पाहिलं आहे. भावाच्या प्रेमापोटी त्याचा व्यवसाय मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या या बहिणीनं भावाच्या दोन मुलांनाही मायेचा आधार दिला आहे.