कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे या शेतकरी चळवळीचे वडील आहेत. शेट्टींनी गेल्या 15 ते 20 वर्षात चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा आणि या सर्व लढ्यामध्ये जपलेली नैतिकता याचा आम्ही कार्यकर्ते आदरच करतो. असे शेट्टींच्या निर्णयावरून नाराज झालेले स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले आहेत. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, चळवळीमध्ये भेद आणि फूट पडणार नाही. याची काळजी घेण्याचे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मात्र, मी स्वतः दोन वेळा विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. शिवाय सावकार मादनाईक यांनीही दोन वेळा विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. गेल्या 16 ते 17 वर्षांपासून संघटनेशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे आतातरी निदान संधी देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, अशी आमची माफक अपेक्षा होती, असेही जालंदर पाटील यांनी म्हटले आहे.