कोल्हापूर (जयसिंगपूर) :आयकर विभागाने देशातील 44 कोटीहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी 1 हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात सोशल मिडियाद्वारे व्यक्त होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या करामध्ये अनेक लोक भरडले जाणार आहेत असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यावर राजु शेट्टी यांनी थेट मैदानात उतरून यामध्ये लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांनीही मोठी मोहीम हाती घेतली आहे.
केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला :केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सदरचा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास 1 हजार रूपये खर्च येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल 44 हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेला आहे.