कोल्हापूर -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा व्हावा, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी शिरोळमध्ये बोलताना दिला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिरोळमध्ये बोलताना शेट्टींनी ईडीकडून झालेल्या कारवाईचे स्वागत करत राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी ज्यांनी कर्ज घेतले ते मोकाटच आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. कर्ज घेतलेल्या अनेकांनी सध्या भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे, या भाजपवासींवर ईडी कारवाई करणार का, असा सवालही राजू शेट्टींनी यावेळी उपस्थित केला.