स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कोल्हापूर Raju Shetti Protest March : गतसाली तुटलेल्या ऊसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल व्हावेत, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (17 ऑक्टोबर) कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली.
37 साखर कारखान्यांवर धडकणार :आजपासून सुरू झालेली ही पदयात्रा गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू, अशा 37 साखर कारखान्यांवर धडकणार आहे. स्वाभिमानीच्या वतीनं पदयात्रा मार्गावरील साखर कारखाना प्रशासनाला याबाबतचं निवेदन देण्यात येणार आहे. तसंच जोपर्यंत दुसऱ्या हप्त्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याचे धुराडे सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.
पालकमंत्र्यांशी करणार चर्चा : महाराष्ट्रात दरवर्षी गळती हंगाम 15 ऑक्टोबरच्या आसपास सुरू होतो. मात्र, यंदा तसं झालं नाही. त्यामुळं आंदोलनाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ चर्चा करणार आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अदा केलीये. मात्र दुसरा हप्ता 400 रुपये देण्यासंदर्भात साखर कारखान्यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळं राजू शेट्टी आक्रमक झाले असून ही लढाई शेतकऱ्यांना चारशे रुपये मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.
7 नोव्हेंबरला होणार पदयात्रेची सांगता : 522 किलोमीटर अंतराच्या पदयात्रेचा समारोप 22 दिवसांनंतर जयसिंगपूर येथे 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत होणार आहे. तसंच चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याबाबत कोणता निर्णय होतो यानंतरच राजू शेट्टी ऊस परिषदेत आपली पुढील भूमिका मांडणार आहेत.
हेही वाचा -
- Ravikant Tupkar Letter To Raju Shetty : रविकांत तुपकरांचे राजू शेट्टींना पत्र; नेमके काय आहे पत्रात?
- सरकारने माकडचाळे थांबवावेत, राजू शेट्टींचा इशारा; कांदा खरेदीसाठी केली 'ही' मागणी
- Raju Shetty : मुलाचे लग्न असतानाही राजू शेट्टी पोहचले कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात