कोल्हापूर - 'आमचं आंदोलन हे राज्य आणि केंद्र सरकार विरोधातील होतं, मात्र भाजपची केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची हिंमत नाही', अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप आणि मित्रपक्षांनी दूध दरवाढीच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावर केली आहे. सोबतच हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलं आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुध दर वाढवून मिळावा, यामागणीसह राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनात शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील आंदोलनाला सुरवात झाली आहे. याच आंदोलनावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, 'भाजप आणि सहयोगी पक्षांचे आंदोलन हे राजकीय आंदोलन होतं, हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा. सोबतच 'भाजपनं दूध पावडर आयात बंदीची मागणी केंद्राकडे करावी' अशी मागणी देखील त्यांनी केली. शेतकऱ्यांबद्दल यांना कळवळा नसून हे राजकीय आंदोलन असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.