कोल्हापूर - Raju Raut Ganesha idol : कोल्हापूरचे वैभव म्हणून नावलौकिक असलेल्या रंकाळा तलावाला प्रदूषणाने ग्रासले आहे, रंकाळ्याचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक सामाजिक घटकांनी योगदान दिले आहे. सामाजिक, पर्यावरणीय चळवळींना बळ देण्यासाठी लेखणी व डफ हाती घेऊन जागर मांडणारे कोल्हापूरचे शाहीर पुरुषोत्तम तथा राजू कृष्णाजी राऊत हे त्यापैकीच एक. रंकाळा संवर्धनाला बळ देणारे काम शाहीर राऊत गेली 41 वर्षाहून अधिक काळ करत आहेत, घरी 23 वर्ष एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना करून, मूर्ती विसर्जित न करता भावी पिढीला रंकाळा वाचवण्याचा संदेश ते देत आहेत.
सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या कोल्हापुरात वडील दिवंगत कृष्णाजी राऊत यांच्या प्रेरणेने शाहीर राजू राऊत यांनी लहानपणापासूनच शाहिरीचे धडे गिरवले. त्यांच्या शाहिरीची कीर्ती कोल्हापूरपासून मॉरिशियस पर्यंत पसरली आहे. शाहिरीतून प्रबोधन करताना आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठीही शाहीर राजू राऊत 1982 पासून कार्यरत आहेत. रंकाळा तलावात होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनाच्या गंभीर समस्येमुळे रंकाळा तलाव नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर रंकाळा बचाव संवर्धन चळवळीने कोल्हापुरातील रंकाळा तलावात होणारी गणेश मूर्ती विसर्जन बंद करून तलावाशेजारी असणाऱ्या इराणी खरीद 21 फुटी गणेश मूर्तींसह सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला या निर्णयात शाहीर राजू राऊत यांचा मोलाचा वाटा होता.
गेल्या 23 वर्षांपासून एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना - कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीचा आग्रही असलेल्या शाहीर राजू राऊत यांनी रंकाळा संवर्धनाचा संदेश स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून देत गेली 23 वर्षे छोटी फायबरच्या गणेश मूर्तींचे पूजन ते घरी करतात, यासोबतच मातीच्या गणोबाचे विसर्जन करताना घरासमोर असलेल्या बागेत मातीच्या मूर्तीवर जल वाहून उरणारी माती बागेसाठी वापरतात. लाडक्या बाप्पाला विसर्जित न करता ही मूर्ती गेली 23 वर्ष शाहीर राऊत यांच्यासह कुटुंबीयांनी प्राणपणाने जपली आहे, सोबतच रंकाळा तलावात होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी अजूनही ते प्रयत्नशील आहेत.
रंकाळ्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी शाहीर राऊत आग्रही - वैभवशाली रंकाळ्याचा बचाव न करता तलावाचे गतवैभव मिळवून देण्यासाठी शाहीर राजू राऊत आग्रही आहेत. यासाठी शिवाजी पेठेतील सजग नागरिकांची समिती करून त्यांनी महापालिका प्रशासनाकडे रंकाळा संवर्धनाचा पाठपुरावा दिली 42 वर्ष सुरू ठेवला आहे. गेली 23 वर्षे एकाच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा शाहीर राऊत यांचा निर्णयाला या परिसरात राहणाऱ्या चार ते पाच कुटुंबीयांनी ही पाठबळ दिले आहे, शाहीर राऊत यांच्या सोबतच ही कुटुंब आता एकच गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करत आहेत.