महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून राज्य मंत्रिपदाची लॉटरी - मंत्रीमंडळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

kolhapur
राजेंद्र पाटील

By

Published : Dec 30, 2019, 1:43 PM IST

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यामध्ये शिवसेनेचे १२ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात शिरोळ मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांची राज्यमंत्रिपदी निवड झाली आहे.

शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये वर्णी लागली आहे. आमदार येड्रावकर हे शिरोळ भागातील नेते शामराव पाटील येड्रावकर यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म ५ मे १९७० साली झाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एनएसयूआयच्या अध्यक्ष पदापासून झाली. वयाच्या विसाव्या वर्षी ते एनएसयूआयचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर 1990 ला जयसिंगपूरचे नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली.

सध्या येड्रावकर हे शरद सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच शैक्षणिक संस्था सूतगिरण्या यांच्या माध्यमातून सहकाराचा मोठा जाळ त्यांच्यामागे आहे. येड्रावकर नेहमीच जयसिंगपूर-शिरोळ-इचलकरंजी भागात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी कार्यरत राहिले आहेत. इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या गटाचे मोठे वर्चस्व आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येड्रावकर यांना राष्ट्रवादीकडून संधी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उल्हास पाटील आणि स्वाभिमानीच्या सावकार मादनाईक यांचा पराभव करून विजय मिळवला.

हेही वाचा -'हे' असू शकतात कोल्हापुरातील संभाव्य मंत्री

राजेंद्र पाटील-येड्रावकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच भेटीनंतर येड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. तर, ठाकरे मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाटील यांना राज्याचे मंत्रिपद मिळाल्यामुळे सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या येड्रावकर गटाला एक नवी उभारी मिळणार आहे.

हेही वाचा - आंदोलन ठीक आहे, पण आम्हाला त्रास का? वयोवृद्ध प्रवाशाने व्यक्त केली नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details