कोल्हापूर - जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच गेल्या 24 तासांपासून कोल्हापूरसह जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून एकूण 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, आज बुधवारी सायंकाळी 8 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. यानंतर एकूण 16 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी पात्राबाहेर पडायला काही फुटच अंतर बाकी असून येत्या 48 तासांत कोल्हापूरसह पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.