कोल्हापूर- राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारीत क्षेत्र करून जिल्ह्यातील 26 गावांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांना संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द केली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.
राज्य शासनाने 16 सप्टेंबर 1985 रोजी अधिसूचना काढून 351.16 चौ.किलो मीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. 1986 ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सीमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील, अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे लोकांच्यावर बंधने आली. राज्य शासन, केंद्र शासन यांच्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उप वनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावे 15 हजार 039 हेक्टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील 15 गावे 10 हजार 26 हेक्टर क्षेत्र असे एकूण 25 हजार 066 हेक्टर क्षेत्रावर संवेदनशील क्षेत्र प्रस्तावित करून 9 ऑक्टोबर 2019 ला केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.
त्यावर 15 ऑक्टोबर 2020 रोजी अधिसूचना प्रसिध्द केली. राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत निश्चित केला. त्यामुळे राधानगरी अभयारण्यापासून 10 किलो मीटरच्या गावांमध्ये असणाऱ्या बंधनापासून थोडी सुटका मिळाली असल्याचे सांगून वनसंरक्षक श्री. चव्हाण यांनी सांगितले. राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीसह सस्तन प्राण्यांच्या 47 प्रजाती सरी-सुर्पांच्या 59 प्रजाती, उभयचऱ्यांच्या 20 आणि फूलपाखरांच्या 60 प्रजाती आढळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, जंगली कुत्रे, शेकरू, गवा, पटेरी वाघ, हत्ती आदी आढळतात. अभयारण्याच्या विस्ताराचे क्षेत्रफळ 250.66 चौ. कि.मी. आहे. या क्षेत्रामध्ये व्यावसायिक उत्खनन, प्रदूषण उत्पन्न करणारे उद्योग, जल विद्युत प्रकल्प, लाकूड गिरण्या, विटभट्टी, प्लॅस्टिक पिशव्यांचा उपयोग, व्यावसायिक हॉटेल, प्रदूषण निर्माण करणारे लघु उद्योग, वृक्षतोड यावर निर्बंध असणार आहेत. स्थानिक नागरिकांना घरांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी जमीन खुदाईला परवानगी असणार आहे.
हेही वाचा -खडसेंच्या प्रवेशाची जय्यत तयारी; राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्राच्या देखरेखीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी, राज्य शासनाद्वारे नियुक्त वन्यजीव संरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ नगर योजनागार, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, लोक निर्माण विभागाचा प्रतिनिधी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक, राज्य सरकारतर्फे नियुक्त पर्यारवण क्षेत्रातील विश्व विद्यालयातील पर्यावरण क्षेत्रातील विशेष तज्ञ, राज्य जैव विविधता बोर्डाचा सदस्य, सावंतवाडी विभागाचे उप वनसंरक्षक हे सदस्य तर कोल्हापूर विभागाचे उप वन संरक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत.