कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या आहेत. यात काही घटनांमध्ये मारहाणही झाली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या अनेकांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. याशिवाय मिरवणुका काढल्यामुळेही अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर कोल्हापुरात अनेक ठिकाणी राडा, अनेकांविरोधात गुन्हे - grampanchayat election
ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर दोन गटांमध्ये वादावादीच्या घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. या घटनांदरम्यान मारहाण होऊन काही जण जखमीही झालेत.
पन्हाळ्याच्या पोखलेमध्ये दोन गटात राडा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी निवडणूक निकालानंतर किरकोळ वाद पाहायला मिळाले. पन्हाळा तालुक्यातल्या पोखले गावात मात्र निकालानंतर दोन गटात राडा झाला आणि यामध्ये तीन जण जखमी झाले. त्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्यानंतर एकूण 33 जणांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बुरंबाळ पैकी धनगरवाडामध्ये सुद्धा 9 जणांवर गुन्हा दाखल
मलकापूर तालुक्यातील बुरंबाळ पैकी धनगरवाडामध्ये सुद्धा निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात राडा होऊन एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. झालेल्या मारहाणीत महिला जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरवणूक काढली आणि 21 जणांवर गुन्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही अनेकांनी मिरवणूक काढल्याचे पाहायला मिळाले. राधानगरी तालुक्यातल्या कंथेवाडी व कोनोलीपैकी कुपलेवाडी येथील कार्यकर्त्यांनी सुद्धा निवडणूक निकालानंतर मिरवणूक काढली. बंदी असतानाही मिरवणूक काढल्याबद्दल दोन्ही गावातील एकूण एकवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -जळगाव : निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री; एकमेकांवरील सशस्त्र हल्ल्यात तिघे गंभीर