कोल्हापूर- उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ आज(सोमवारी) शिवसेनेने कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. लखीमपूर येथील हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर कडक कारवाई करून भाजपचा निषेध करण्यात आला. जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर राहून आंदोलन करतच राहील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
देशातील नागरिकांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेने दिला आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील घटना ही लोकशाहीचा खून करणारी आहे. शेतकरी आपला कैवारी आहे. आपला अन्नदाता आहे. मात्र शेतकऱ्याला मोडीत काढण्याचे काम भाजप सरकार करत आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्यास तयार आहोत. असा इशारा शिवसेनेने देत भाजपचा निषेध केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.