कोल्हापूर - जुन्या कोर्टाची इमारत कोविड रुग्णालयासाठी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर कृती समितीकडून करण्यात आली होती. मात्र, ही इमारत देण्यास राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी नकार दिला आहे. त्याबाबतचे एक पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आहे. त्यांचा या नकाराचा निषेध म्हणून आज कृती समितीने राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या प्रतिमेचे पंचगंगा नदीत विसर्जन केले.
राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांचा कोल्हापुरात निषेध; प्रतिमेचे पंचगंगा नदीत विसर्जन - मुख्य सचिव संजयकुमार न्यूज
कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी रुग्णालये अपुरी पडत आहे. कोविड रुग्णालयाच्या विस्तारिकरणासाठी नागरी कृती समितीने जिल्हा न्यायालयाच्या जून्या इमारतीची मागणी केली होती. मात्र, राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.
![राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांचा कोल्हापुरात निषेध; प्रतिमेचे पंचगंगा नदीत विसर्जन protest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8821792-thumbnail-3x2-river.jpg)
कोल्हापूरमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. उपचारासाठी वापरले जाणारे शासकीय व खासगी रुग्णालये फुल्ल झाल्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाहीत. उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. सीपीआर रुग्णालयासमोरील तीस फूटांचा रस्ता ओलांडल्यावर जिल्हा न्यायालयाची वापरात नसलेली जुनी इमारती आहे. ही इमारत ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात सीपीआर रुग्णालयाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे न्यायालयाची बंद इमारत कोविड रुग्णालयासाठी द्या, अशी मागणी कोल्हापूर नागरी कृती समितीने केली होती. त्यावर जुन्या कोर्ट इमारतीची वैद्यकीय उपचरासाठी कोणी मागणी करू नये, असे लेखी आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी काढले आहेत.
उपचारासाठी जागा मागू नका, देणार नाही म्हणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा. त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई करावी. अन्यथा कोल्हापूरची जनता त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करेल, असा इशारा आज नागरी कृती समितीच्यावतीने देण्यात आला. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, रामभाऊ कोळेकर, उदय बाबा भोसले, सुनील मोहिते आदी उपस्थित होते.