कोल्हापूर - गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याने आपल्या दोन सुपुत्रांना गमावले आहे. हुतात्मा ऋषिकेश जोंधळे व संग्राम पाटील यांच्या दुःखात सहभागी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांच्या पाठीमागे ठाम राहावे. असे मत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. आमदार ऋतुराज पाटील यांनी आज निगवे खालसा या गावी भेट देऊन हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
प्रतिक्रिया देताना आमदार ऋतुराज पाटील आणि ग्रामस्थ संग्राम याचा जन्म मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. गावातील तरुणांमध्ये भारतीय लष्करात सेवा भावना असल्याने संग्रामने देखील भारतीय लष्करात जाण्याचे ठरवले. २००२ साली संग्राम लष्करात दाखल झाले. पाटील यांनी गेली सतरा वर्षे मराठा बटालियनमध्ये सेवा बजावली. अत्यंत प्रामाणिक आणि देशसेवेसाठी कर्तव्यदक्ष असलेले पाटील यांच्या आधारावर गावाकडे त्यांचे आई-वडील भाऊ यांनी शेती आणि संसार उभा केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असून दोन वर्षापूर्वी त्यांनी हवालदार पदाच्या पदोन्नतीसाठी आपली सेवा वाढवून घेतली होती.
पाकिस्तानकडून गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा
काल मध्यरात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग झाल्याने त्यांनी केलेल्या गोळीबारात संग्राम पाटील शहीद झाले. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. आज सकाळपासून गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चबुतरा बांधण्याचे कामही गावकऱ्यांनी हाती घेतले आहे. गावात सैन्य व शासकीय अधिकारी आले आहेत.
गावावर पहिलाच प्रसंग
करवीर तालुक्यातील निगवे खालसा या गावात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जवान देश सेवेसाठी कार्यरत आहेत. त्यातील १५ जवान निवृत्त झाले असून ९० जवान सध्या देशाची सेवा करत आहेत. मात्र, पहिल्यांदाच गावातील संग्राम पाटील हा जवान देश कार्य बजावत असताना हुतात्मा झाला. त्यामुळे, गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे असे असले तरी गावाच्या सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले याचा अभिमान माजी सैनिकांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे - आमदार ऋतुराज पाटील
निगवे खालसा या गावातील जवान हुतात्मा झाल्याचे कळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. सकाळी तीन वाजता पाकिस्तानच्या हल्ल्यात संग्राम हुतात्मा झाल्याचे कळताच आमदार पाटील यांना धक्का बसला. कोल्हापूरच्या दोन जवानांनी या आठवड्यात देशसेवेसाठी आपले बलिदान दिले आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे. अशी प्रतिक्रिया आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. देशासाठी आमच्या गावचा सुपुत्र हुतात्मा झाला. याचा अभिमान असला तरी गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील दोन सुपुत्रांना आपला जीव गमवावा लागला, हे दुर्दैव म्हणावे लागेल, असेही आमदार पाटील म्हणाले.
२२ कोटींचा पाकिस्तान उदध्वस्त करा..
वारंवार पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कुरघोड्या सुरूच आहेत. त्यामुळे, पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून हटवले पाहिजे. आम्ही अजून किती जवानांना मुकणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. भारत शक्तिशाली समजला जातो, पण पाकिस्तानला कधी उत्तर देणार? जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येत नाही, तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही. असे मत माजी सैनिकांनी व्यक्त केले. २२ कोटीच्या पाकिस्तानला १४० कोटीची जनता उत्तर देऊ शकते. त्यामुळे, जवानांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून हद्दपार केले पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
हेही वाचा -'आप'च्या वतीने कोल्हापुरात शिवसेनेच्या वचननाम्याची होळी