कोल्हापूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे अजून सुरू झालेली नाहीत. मात्र, कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मंदिराच्या रंगरंगोटीचे कामही आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सध्या मुख्य शिखराचे रंगकाम पूर्ण झाले आहे. तसेच विद्युत रोषणाईच्या कामालाही सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदासुद्धा नवरात्रोत्सव भक्तांविना असला तरी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यंदाही हा नवरात्रोत्सव उत्साहात पार पडणार आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव हा सर्वात मोठा सण असतो. यावर्षी कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. घटस्थापना 17 ऑक्टोबरला आहे. त्याला आता केवळ 15 ते 20 दिवस उरले आहेत. या काळात मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा मंदिरात ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो, त्याच पद्धतीने यंदासुद्धा नवरात्रोत्सव पार पडणार आहे. शिवाय देवीची दररोज विविध रुपात पूजासुद्धा बांधण्यात येणार आहे.
उत्सवाची तयारीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यावर्षी भक्तांविना नवरात्रोत्सव साजरा करावा लागत आहे. मात्र, त्याच उत्साहात यावर्षी नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.