कोल्हापूर- महावितरणने शेतकर्यांना वीज बिलात 50 टक्के सवलत देता येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. परंतु त्यावर ते निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे की अजित पवार, असा सवाल जनतेला पडला आहे. त्यामुळे याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सम्राट शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर कोल्हापुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा -
मराठा आरक्षणाबाबत बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. परंतु त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला. तसा आदेशही काढला. त्याला आमचा पाठिंबा आहे. अनेक आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड संघटनेने शासनाने जो निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी करून घ्यावी, असेदेखील आंबेडकर म्हणाले.