कोल्हापूर- कोरोना काळात राहीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कोरोनामुळे सराव बंद होता. अशा परिस्थितीत राहीने दिल्लीतील विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. माझी राही खंबीर आहे. पुन्हा तिची निवड ऑलम्पिक मध्ये झाली आहे. ती नक्की जिंकेल, असा विश्वास नेमबाज राही सरनोबत यांच्या मातोश्री प्रभा सरनोबत यांनी व्यक्त केले.
कोरोनामुळे सराव होता बंद -
कोरोनामुळे गतवर्षी स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा विश्वचषक स्पर्धेत राही, कशी कामगिरी करेल याची चिंता लागली होती. कोरोनामुळे तिचा सराव बंद होता. नुकतीच तिने सरावाला सुरुवात केली होती. वर्षभर स्पर्धा सुरू नसल्यामुळे स्पर्धेबद्दल केवळ सराव सराव सुरू असल्याने स्पर्धेचा अंदाज येत नव्हता. मात्र, अशा परिस्थितीत देशासाठी रौप्यपदक पटकावले, याचा आनंद वाटतो, असे मत प्रभा सरनोबत यांनी व्यक्त केले.
राहीने रौप्य पदक पटकावल्यानंतर तिच्या आई प्रभा सरनोबत यांची प्रतिक्रिया.. दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याने कुटुंबीय खुश आहेत. मागील ऑलॉम्पिक स्पर्धेत राहीची निवड झाली होती. यंदाही ऑलॉम्पिक स्पर्धेत पात्र झाले आहेत. ती नक्की चांगली कामगिरी करेल असा विश्वास आई प्रभा सरनोबत यांनी व्यक्त केला.
राहीने पटकावले रौप्य पदक -
राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली आहे. 25 मीटर पिस्तुल प्रकारात तिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. मागच्यावर्षीसुद्धा राही सरनोबतने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे राहीच्या कुटुंबासह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजपर्यंत 100 हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदके
कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील राही सरनोबत गेल्या अनेक वर्षांपासून 25 मीटर पिस्तुल प्रकारात आपलं नाव करत आली आहे. तिने आपल्या दमदार कामगिरीने आजपर्यंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 100 हून अधिक पदकांवर आपले नाव कोरले आहे. राही सध्या टोकियो ऑलम्पिकसाठी सराव करत आहे. त्यातच आता दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक 2021 स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई केल्याने तिचा आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. राहीच्या रौप्य पदकाच्या कमाईनंतर तिच्या घरात आनंद साजरा केला जात असून तिला पुढच्या स्पर्धांसाठीसुद्धा कोल्हापूरकर शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा -कोल्हापूरच्या लेकीचा दिल्लीत डंका, नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पटकावले रौप्य पदक