महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात साजरा केला चक्क 'पोस्टकार्ड'चा वाढदिवस - वाढदिवस

गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून जे पोस्टकार्ड आपल्या सर्वांच्या भावनांची देवाणघेवाण करत आहे त्याच पोस्टकार्डचा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा केला. भावनांचे दळणवळण करणाऱ्या या पोस्टकार्डला आज 141 वर्षे पूर्ण झाली आहेत. फेसबूक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेल या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजही अनेकांचा पोस्ट कार्डवरील विश्वास उडालेला नाही.

वाढदिवस

By

Published : Jul 1, 2019, 8:58 PM IST

कोल्हापूर- सजवलेला केक... जवळ गुलाबाची फुले आणि पोस्ट कार्ड पाहून नेमकं काय आहे याबाबत तुमच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या असतील, पण केक पाहिल्यानंतर कोणाचातरी वाढदिवस असेल असे तुम्हाला वाटले असेल. होय हा वाढदिवसच आहे, पण कुठल्या व्यक्तीचा नाही किंवा कोणत्या प्राण्यांचा नाही तर हा वाढदिवस आहे 'पोस्ट कार्डचा'. कोल्हापुरातल्या पोस्ट ऑफिस प्रधान कार्यालयात आज चक्क पोस्टकार्डचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोल्हापुरात साजरा केला चक्क 'पोस्टकार्ड'चा वाढदिवस

गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून जे पोस्टकार्ड आपल्या सर्वांच्या भावनांची देवाणघेवाण करत आहे त्याच पोस्टकार्डचा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा केला. भावनांचे दळणवळण करणाऱ्या या पोस्टकार्डला आज 141 वर्षे पूर्ण झाली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेल या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजही अनेकांचा पोस्ट कार्डवरील विश्वास उडालेला नाही. त्याचीच प्रचिती आज कोल्हापुरात आली. येथील पोस्ट ऑफिस प्रधान कार्यालयात आज चक्क पोस्टकार्डचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 141 वर्ष पूर्ण झालेल्या पोस्टकार्डचा कार्यालयातील सर्वच पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा केला आणि भावनांचे दळणवळण असेच सुरू राहावे, अशी इच्छासुद्धा येथील अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

आमचं आयुष्य संपत आलं पण, पोस्टकार्डची स्वस्तात मस्त सेवा अविरत सुरूच

गेल्या अनेक वर्षांपासून मी पोस्ट खात्यात काम करत आहे. अनेक बदल या नोकरीत सेवा करत असताना पाहिले आहेत. अगदी क्लार्कपासून पोस्ट मास्तरपर्यंत काम केले आहे. पण, पोस्टकार्डची किंमत मात्र समाजातील सर्वच घटकांना परवडेल अशी आहे. विशेष म्हणजे ही सेवा आजही अविरतपणे सुरू असल्याची भावना कार्यालयातील अधिकारी सुधाकर म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

मोबाईलवरून मॅसेज पाठवता येतो पण भावना नाही...

सध्याच्या या अँड्रॉइडच्या जमान्यात अनेक मॅसेजचे देवाणघेवाण करता येते. काही क्षणांत आपला मॅसेज दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येतो. पण या मॅसेजसोबत आपल्या भावना पाठवता येत नाही. पण एखादी आई जरी आपल्या मुलाला पोस्टकार्डमधून पत्र लिहत असेल तर त्या आईच्या त्या पत्रामधून भावनासुद्धा व्यक्त होत असतात, अशा प्रतिक्रिया काही निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

पोस्टकार्डचा इतिहास :

सर्वात पहिल्यांदा 1869 मध्ये ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या पोस्टकार्डला लोकांकडून एवढी पसंती मिळाली की, एका महिन्यात जवळपास 15 लाख पोस्टकार्ड विकले गेले. ऑस्ट्रेलियानंतर बाकीच्या देशांनीसुद्धा याचा वापर करायला सुरुवात केली. जून 1879 मध्ये सर्वात पहिल्यांदा भारतात या पोस्टकार्डचा वापर करण्यात आला. त्यावेळी त्याची केवळ 3 पैसे इतकी किंमत होती. ऑस्ट्रेलियाबरोबर भारतातसुद्धा या पोस्टकार्डला चांगलीच पसंती मिळाली. पहिल्या 5 - 6 महिन्यातच जवळपास 8 लाख पोस्टकार्ड भारतात विकले गेले. सुरुवातीला कार्डच्या फक्त एकाच बाजूला संदेश लिहले जायचे पण हळूहळू यामध्ये बदल होत गेले आणि दोन्ही बाजूला संदेश लिहता येऊ लागले. पोस्टकार्डच्या किंमतीत अनेक बदल होत गेले पण 141 वर्षे होऊनही याची किंमत केवळ 50 पैसे इतक्यावर येऊन थांबली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details