कोल्हापूर - जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून निश्चित शिथिलता देण्यात येणार असून त्याबाबतची नियमावली रविवार जाहीर होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, 20 जुलैपासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. उद्या रविवारी त्याची मुदत संपणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या सर्वच सूचनांचे पालन केले. लॉकडाऊनच्या दरम्यान ज्या उपाययोजना करणे अपेक्षित होतं, त्या करण्याचा प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या लॉकडाऊनची मुदत उद्या रविवारी संपते. सोमवारपासून या लॉकडाऊनमध्ये निश्चितपणे आपण शिथिलता आणणार असून कोणत्या गोष्टी किती वेळेपर्यंत खुल्या राहणार आहेत याचा सविस्तर आदेश उद्या रविवारी जाहीर करण्यात येईल.
कोल्हापुरातील लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून शिथिलता, रविवारी होणार नियमावली जाहीर - kolhapur district news
कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून निश्चित शिथिलता देण्यात येणार असून त्याबाबतची नियमावली रविवारी जाहीर होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
नागरिकांनी जे अनुभव घेतलेले आहेत यावर आता पथ्य पाळणे गरजेचे आहे. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, मास्क सक्तीने वापरणे गरजेचं आहे. सामाजिक अंतराचे योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. समूह संसर्गामध्ये अंत्यविधीला गेल्याच्या गोष्टी पुढे आल्या आहेत. वाढदिवसामुळे एकत्र आल्याने संसर्ग वाढण्याचेही निदर्शनास आले आहे. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे अडचण होत आहे. रोजगाराची अडचण होत आहे त्यामुळे आम्ही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत आहोत. परंतु काहीही करण्यासाठी स्वातंत्र्य नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. शिथिलता आणल्यानंतर नियमांचे काटेकोरपालन करा. लढाई संपलेली नाही, सुरुच आहे. प्रशासन म्हणून आमचे सर्व प्रयत्न होते आणि राहणार आहेत, अशी ग्वाही सुद्धा पालकमंत्री पाटील यांनी दिली.