कोल्हापूर-पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुरू केलेली पंचगंगा परिक्रमा यात्रा आज(रविवारी) नरसिंह वाडी येथे पोहोचणार आहे. दुपारी तीन वाजता हजारो कार्यकर्त्यांसह कृष्णा नदीच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नरसिंहवाडी येथे पाचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासह रेस्क्यू टीम, बोट यासह अन्य साहित्य देखील तैनात करण्यात आला आहे. त्याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी...
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा पोलिसांनी घेतला धसका, नृसिंहवाडीत पोलिसांचा फौजफाटा तैनात - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधीचा इशारा
माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक सप्टेंबर पासून पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. विविध गावातून मार्गक्रमन करत आलेली ही यात्रा रविवारी नरसिंह वाडी येथे आल्यानंतर समाप्त करण्यात येणार आहे. मात्र, सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागण्या पूर्ण न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि राजू शेट्टी हे कृष्णा नदीच्या पाण्यात जलसमाधी घेतील असा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नरसिंहवाडी येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 500 पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तसेच नृसिंहवाडीच्या चारही बाजूला पोलिसांनी बॅरिकेट लावून प्रवेश बंद करण्या आला आहे. तसेच रबर बोटीही आणून ठेवण्यात आल्या आहेत.
या आहेत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या
2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफी करावी
पूरग्रस्तांचे मागणीप्रमाणे सोयीचे पुनर्वसन करावे
पंचगंगा आणि कृष्णा नदीवर असणारे फुलाचे भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधावे
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट शैक्षणिक फी माफ करावी