व्हीलचेअरवरील सौंदर्यवती 'पूनम' गोव्यात करणार कोल्हापूरचे प्रतिनिधित्व
दिव्याग असल्याचा न्यूनगंड न बाळगता स्वत:च्या जिद्दीवर कोल्हापुरातील पूनमने सौंदर्यवती होण्याचा बहुमान मिळवला आहे. व्हीलचेअरवरची सोबत लाभलेल्या पूनम आता गोव्यातील सौदर्यवती स्पर्धेत सहभागी होणार आहेत
कोल्हापूर- जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोल्हापुरातील पूनम महादेव सांगावकर हिने व्हीलचेअर ते सौंदर्यवतीचा बहुमान मिळवला आहे. गोवा येथे होणाऱ्या दिव्यांगांच्या सौंदर्य स्पर्धेत पूनम सांगावकर कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सकारात्मक विचार हेच माझ्या यशाचे कारण असल्याचे पूनम सांगतात. अपंगत्वावर मात करणाऱ्या पूनम यांचा प्रवास ईटीव्ही भारतच्या माध्यमातून..
पूनम सांगावकर या जन्मापासून दिव्यांग आहेत. कोल्हापुरातील बुरुड गल्ली येथे आपल्या आई-वडिलांसोबत त्या राहतात. त्यांचे बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी व्हीलचेअर सोबत येईल, असे वाटले असताना वयाच्या 22 व्या वर्षीच व्हीलचेअरला सोबत घेत आयुष्याचा भाग बनवावे लागले. अपेक्षापेक्षा लवकरच व्हीलचेअर सोबत आल्याने पूनम काहीश्या नाराज झाल्या होत्या. पण यातून पुढे काय करायचे? हा प्रश्न त्यांना बसू देईना. अशातच एका मैत्रिणीने पूनमला प्रोत्साहन दिले. त्यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेची तयारी करण्याचे पूनम यांना सुचवले आणि तिथूनच पूनमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आपण आपले स्वतःचे नवीन स्थान निर्माण करू असे ठरवत पूनमने या सौंदर्य स्पर्धेत भागही घेतला.
गोवा येथे होणाऱ्या अंतिम फेरीत निवड
शांतिदूत प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत पूनम सांगावकर यांनी भाग घेतला. त्या स्पर्धेत दहा मुलींमधून पूनम यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर विभागात त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. जिल्ह्यातील पहिली अशी दिव्यांग महिला आहे जिची गोवा येथे होणाऱ्या अंतिम फेरीत निवड झाली.
तेथेही जिंकण्याचा सकारात्मक आत्मविश्वास
गोव्यामध्ये होणाऱ्या स्पर्धेत जास्त चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेन. तिथून देखील मी जिंकून येईन, माझ्या सारख्या अन्य दिव्यांग मुलांना त्यातून प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. अनेक दिव्यांग मुला-मुलींना सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. यातूनच मला हे दाखवून द्यायचे आहे, असा आत्मविश्वास पूनम सांगावकर यांनी व्यक्त केला आहे.
हो मी सुंदर आहे
दिव्यांग असले तरी मी स्वतःला सुंदर समजते, असा सकारात्मक विचार पूनमच्या अंगी ठासून भरला आहे. स्वतःला तुम्ही कसे वागवता. स्वतःला आरशात पाहून सुंदर म्हणता आले पाहिजे. आपण स्वतः सुंदर म्हणून घेतल्याशिवाय आपल्यामध्ये सकारात्मक आत्मविश्वास तयार होत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला सुंदर म्हणाली नाही तरी चालेल, पण आपण स्वतः सुंदर आहोत याचं समाधान आपल्याकडे असायला हवे. तुमची आवड काय आहे? कोणती गोष्ट करण्यास तुम्हाला आवडेल? त्यात तुमची आवड निर्माण करा आणि त्यातून पुढे जाण्यासाठी काय केले पाहिजे? हे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने समजून घेतले पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं पूनम सांगावकर सांगतात.
आई-वडिलांच्या पाठबळामुळे माझा प्रवास यशस्वी
या प्रवासात आई-वडिलांचे आणि नातेवाईकांचे नियमित पाठबळ मिळाले आहे. सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी आई-बाबांनी व माझ्या नातेवाईकांनी प्रोत्साहन दिले. माझा दिव्यांग असण्याचा काहीवेळा मला त्रास होतो, पण माझ्या आईवडिलांनी त्याचे दुःख कधी वाटू दिले नाही. मी काहीतरी नवीन करते, यासाठी माझ्या पाठीमागे माझे वडील कायम उभा राहिले आहेत. दिव्यांग माणसाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र माझ्या आईवडिलांनी नेहमीच माझी हौस पुरवली आहे. प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझा प्रवास यशस्वी सुरू असल्याचे आहे.
शिकवणीमुळे आर्थिक हातभार
पूनम सांगावकर यांचे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे. घरात बसून पुनम यांनी गल्लीतील लहान मुलांना शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे घर बसल्या देखील आर्थिक कमाई करण्याचे काम पुनम करतात. शिवाय लहानांची संगत मिळाल्याने माझा दिव्यांग असण्याचा कोणताही त्रास किंवा कमीपणा वाटत नसल्याचं पूनम सांगावकर सांगतात.