कोल्हापूर -जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून सशर्त परवानगी दिली आहे. केवळ 50 लोकांच्या मर्यादेतच हा सोहळा पार पडावा लागणार आहे. या निर्णयामुळे मंगल कार्यालय मालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
मंगल कार्यालयात विवाहास परवानगी; 50 जणांच्या उपस्थितीतच होणार समारंभ - मंगल कार्यालयात विवाह समारंभ
जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून सशर्त परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी 50 लोकांची अट मात्र कायम ठेवली आहे.
मंगल कार्यालय
लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाले होते. अनेकांनी आपले विवाह समारंभ रद्द केले. 31 मे रोजी शासनाने विवाह समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याची परवानगी दिली होती. तथापि, मंगल कार्यालयात विवाह सोहळा पार पाडण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे जागेअभावी अनेकांनी विवाह पुढे ढकलले. मात्र, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आता मंगल कार्यालयांना परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी 50 लोकांची अट मात्र कायम ठेवली आहे.
जिल्हाधिकारी देसाई यांनी या अटी घातल्या आहेत -
- लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांचे अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे.
- लग्नाचे ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक आहे.
- प्रवेशद्वार, बैठक कक्ष, भोजन कक्ष, बाथरूम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिताची साधने व पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर्स ठेवण्यात यावेत.
- भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लग्नाचे ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा.
- 1% सोडियम हायपोक्लोराईड वापरून हे ठिकाण निर्जंतूक करण्यात यावे.
- वरच्या मजल्यावर जाण्या-येण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा.
- लग्नकार्यास उपस्थित राहणाऱ्या 50 व्यक्तींनी त्यांचे मोबाइलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे.