कोल्हापूर- मागील वर्षी आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावाला मोठा फटका बसला होता. गावातील अनेक घरांची पडझड झाली. अभिनेता सलमान खानने हे गाव दत्तक घेत गावकऱ्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले मात्र, आजपर्यंत मदत मिळाली नसून अनेकांचा संसार उघड्यावर आहे.
सलमान खानच्या दत्तक 'खिद्रापूरात' आजही अनेकांचे संसार उघड्यावर अभिनेता सलमान खानने दत्तक घेतलेल्या खिद्रापूर गावात गेल्या वर्षी आलेल्या महाप्रलयात गावातील जवळपास ३० हुन अधिक घरे जमीनदोस्त झाली. अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर पुराच्या पाण्यात वाहून गेले. संसार उघड्यावर पडला. डोळ्यादेखत उभा केलेला संसार वाहून गेल्यानं अनेकांच्या पायाखालची जमीन खचली. अशावेळी मदतीला धावून आला तो अभिनेता सलमान खान. बिइंग ह्युमन आणि एलान फाउंडेशनने गाव दत्तक घेऊन, घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. या निर्णयामुळे पूरग्रस्तांना आधार मिळाला मात्र, अद्याप निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने खिद्रापूरकरांच्या नशिबी घरे आलेले नाही.
कोल्हापूर जिल्हा परिषद, सलमान खानच्या बिईंग ह्युमन व एलान संस्थेने पुढाकार घेऊन गावात सर्वेक्षण केले. लाभार्थ्यांची यादी तयार केली. सुरवातीला 300 स्क्वेअर फुटाचे घर बांधून देऊ असे आश्वासन दिले. मात्र अद्याप घर बांधकामाला मुहूर्त मिळाला नाही आहे. याबद्दल विचारणा केली असता समितीमधील सदस्यांकडून मात्र उडवाउडवीची मिळाल्याची माहिती ग्रामसेवक महालिंग अक्कीवाट यांनी दिली.
हेही वाचा - वैद्यकीयसह दंत अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती
सलमान खान घर बांधून देणार या आशेवर गावातील अनेक लोक आजही पडक्या अवस्थेतील घरात राहत आहे. वाश्याला बांबूचा टेकू दिलेल्या घरात आपल्या लेकराबाळासह जीव मुठीत घेऊन ही मंडळी जगत आहेत. ज्यांना सरकारकडून 95 हजार नुकसान भरपाई मिळाली होती. त्यांनी थोडीशी डागडुजी करून पुन्हा संसार थाटला. पण सरकारचे पैसे संस्थेकडे जमा करतील त्यांनाच घराचा लाभ मिळणार असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यामुळे आमचेच पैसे घेऊन सलमान घर बांधून देत असेल तर मग सलमान कशाला ? असा प्रश्न गावकरी करत आहे. ग्रामपंचायत आणि समितीच्या सदस्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे. तसेच, सुरवातीला दिलेले आश्वासन आणि करार करताना घातलेल्या अटी, त्यामुळे गावकरी संभ्रमात आहे. त्यामुळे सलमान खान दिलेले आश्वासन पूर्ण करणार का? याची प्रतीक्षा गावकऱ्यांना लागली आहे.