कोल्हापूर- मागील वर्षापासून कोरोनाच्या पाश्वभूमीवर झालेली टाळेबंदी, लादलेल्या कडक निर्बंधामुळे अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका दुर्गम भागातील नागरिकांना बसला आहे. जंगलातील रानमेवा विकून पावसाळा काढायचा त्यानंतर शेतातील विविध कामे करायची, असे आयुष्य असेलल्यांना मागील वर्षापासून कोरोनामुळे रानमेवा विकता आला नाही. त्यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा हे तालुके दुर्गम आहेत. जिल्ह्यात जवळपास 80 पेक्षा जास्त धनगरवाडे या दुर्गम भागात वास्तव्यास आहेत. तर एकट्या गगनबावडा तालुक्यात 20 ते 25 धनगरवाडे आहेत. यांचा प्रमुख व्यवसाय शेळी-मेंडी पालन असला तरी, जंगलाची राखण करत ते पारंपारिक व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह सुरू ठेवतात. तर एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत जंगलातील रानमेवा विकून वर्षभराचा चरितार्थ चालवतात. मात्र गेल्यावर्षापासून कोरोनामुळे झालेली टाळेबंदी व यंदा सुरू असलेल्या निर्बंधामुळे यांना फटका बसला आहे. जंगलातील काजू, आंबा, करवंदे, आळू, फणस आणून शहरात विक्रीसाठी आणले जात होते. मात्र, गेल्या वर्षी लागलेली टाळेबंदी व या वर्षी सुरू असलेले कडक निर्बंध यामुळे रानमेवा विकताच आला नाही.
हंगामात सुमारे 40 हजारांची मिळकत
दरवर्षी येणाऱ्या हंगामात येथील धनगरवाड्यातील कुटुंबाना तीन महिन्यांत सुमारे 40 हजाराचे उत्पन्न मिळत हेते. त्यातून वर्षभर लागणारे साहित्य विकत घेऊन वर्षभर ते पुरवून खाल्ले जात. जंगलात मिळणारा रानमेवा घेऊन ते 50 किलोमीटरवर शहरात घेऊन जायचे. दिवसभर विकून पुन्हा पायपीट करत घरी जायचे, असा दिनक्रम तीन महिनेा चालत होता.