कोल्हापूर- महाराष्ट्रासह राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून (सोमवार) प्रारंभ झाला. यामध्ये यंदा भरपूर पाऊस पडेल कडधान्य महाग होईल अशी भाकनुक करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल बिरदेव यात्रेतील धार्मिक विधी हे पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडले. भाविकांच्या उपस्थितीत बिरदेवाच्या नावाने चांगभलं म्हणत आणि फरांडेबाबांचा हेडाम व भाकणुक सोहळाही यावेळी पार पडला.
हेही वाचा-तपास यंत्रणेच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशद पसरवण्याचा प्रयत्न - हसन मुश्रीफ
भंडाऱ्याची उधळण, मानाच्या तलवारीचे पूजन आणि भाकनुक
दरवर्षी मोठ्या उत्साहात पट्टणकोडोली येथील बिरदेव यात्रा पार पडत असते. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली होती. केवळ पारंपरिक विधी पार पडले होते. मात्र, यंदा कोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोहळ्याची परवानगी मिळाली होती. त्यानुसार पारंपरिक पद्धतीने सकाळी गावचावडी येथे मानाच्या तलवारीचे पूजन पार पडले. त्यानंतर मोजकेच मानकरी फरांडे बाबा यांच्या भेटीला गेले. ढोल ताशा वाजत-गाजत भंडाऱ्याच्या उधळणीत तसेच श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर करीत ही मिरवणूक बिरदेव मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी आली. त्यानंतर भंडाऱ्याची, लोकर खारीक खोबऱ्याची उधळण करण्यात आली.