कोल्हापूर - शस्त्रक्रिया करायची म्हणून एका रुग्णाला शस्त्रक्रिया विभागातील बेडवर तब्बल पाच तास ताटकळत ठेवल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. ऑपरेशन असून सुद्धा डॉक्टरच आले नसल्याने हा प्रकार घडल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ. सूर्यकांत सातपुते यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणीही रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.
शस्त्रक्रियेसाठी रुग्ण बेडवर आणि डॉक्टर गुल कोडोली उपजिल्हा रुग्णालयात नेमकं काय घडलं? -
पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी अशोक कांबळे (वय 70, रा. कोडोली) यांना पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार होती. त्याबाबतची संपूर्ण तयारी सुद्धा करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले होते. संबंधित रुग्ण कांबळे यांनी बेडवर झोपवण्यात सुद्धा आले. त्यानंतर डॉक्टर आता येतील मग येथील म्हणत तब्बल पाच तास झाले तरी ते आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापूर्वी सुद्धा असा प्रकार झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद उमटताच डॉ. सातपुते यांनी रुग्णालयात येऊन संबंधित रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. दरम्यान, आशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शस्त्रक्रियेसाठी रुग्ण बेडवर आणि डॉक्टर गुल अधीक्षकांनी डॉ. सातपुते यांच्याकडे मागविला लेखी खुलासा-
दरम्यान, स्थानिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर घटनेबाबत रुग्णालय प्रशासनास जाब विचारला असता त्यांनी संबंधित डॉ. सूर्यकांत सातपुते यांच्याकडे लेखी खुलासा मागविण्यात येईल असे आश्वासन दिले. शिवाय असा गंभीर प्रकार कधी होणार नाही याची काळजी घ्यायची समज सुद्धा डॉक्टरांना देण्यात येईल असे आश्वासन दिले. दरम्यान, या डॉक्टरांची गंभीर चुक लक्षात घेऊन त्यांना तात्काळ निलंबित करावे किंवा त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.