पन्हाळा तालुक्यातील बैल जोडीचा मृत्यू कोल्हापूर: धरणक्षेत्रात मुसळधार आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूरची जीवनदायीनी असलेल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे माणसांसह अनेक प्राण्यांना देखील याचा फटका बसत आहे. आज दुपारच्या सुमारास कासारी नदीच्या पुराचे पाणी पाहून बिथरलेल्या बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे घडली आहे. तर या घटनेत सुदैवाने बैलजोडी मालक बचावला आहे.
पाण्यात गुदमरून जनावरांचा मृत्यू :आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे राहणारे महादेव महाडिक हे बैलांना धुण्यासाठी कासारी नदी परिसरात गेले होते. सध्या अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान कासारी नदीलाही मोठ्या प्रमाणत पाणी आले आहे. पुराचे पाणी असूनही बैलजोडी मालकाने ही बैलगाडी पुढे नेली आणि पुराचे पाणी पाहून बैल अचानक बिथरले. बैल बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले मात्र, यावेळी पाण्यात गुदमरून दोन्ही बैलांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बैलजोडी मालकाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान आहे.
आगीत होरपळून 4 जनावरांचा मृत्यू: एका बाजूला पाण्यात बुडून 2 बैलांचा मृत्यू झालेला असताना, दुसऱ्या बाजुला रविवारी पन्हाळा तालुक्यातीलच उत्रे या गावात गोठ्याला अचानक आग लागली. आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुंडोपंत कृष्णा हांडे यांच्या जनावराच्या गोठ्याला ही आग लागली. तर संपूर्ण शेड जळून खाक झाले आहे. यामध्ये सुमारे तीन लाख ७० हजारांचे नुकसान झाले आहे.
गोठ्याला लागली आग : पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावच्या शेजारी मठाजवळ वैरणीची साठवणूक करण्यासाठी व जनावरे बांधण्यासाठी हांडे यांनी गोठा बांधला होता. रविवारी रात्री जनावरांना वैरण घालून डासांचा त्रास नको म्हणून धुमी घालून, रात्री आठच्या सुमारास ते घरी गेले होते. मात्र मध्यरात्री अचानक गोठयाला आग लागल्याचे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्याच्या बाहेर गेल्याने या आगीमध्ये एक म्हैस, एक गाय, एक रेडी, एक पाडा अशी चार जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली आहेत, तर एका म्हशीला वाचवण्यात यश आले.
हेही वाचा -
- Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
- Heavy Rainfall in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
- Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर; पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट