कोल्हापूर - काही दिवसांपूर्वी तेरवाड बंधाऱ्यात मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता शिरोळ बंधाऱ्यातसुद्धा मासे मृत्यूमुखी पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करा, असे आदेश दिले होते. मात्र अजूनही प्रदूषणाचे प्रमाण काही केल्या कमी झालं नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे. आज शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत्यूमुखी पडले असून पाण्याचा उग्र वासही येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच संतापले आहेत.
पंचगंगा नदी प्रदूषण : तेरवाडनंतर आता शिरोळ बंधाऱ्यातसुद्धा हजारो मासे मृत्यूमुखी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा हजारो जलचर प्राणी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच प्रदूषित घटकांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून औद्योगिक कारखान्यांच्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नदीतील पाणी फेसाळत आहे. आंदोलकांनी वारंवार आंदोलन केल्याने व जिल्हाधिकारी यांनी नदी प्रदूषणाबाबत कडक भूमिका घेऊनही नदी प्रदूषणात वाढच कशी होत आहे? की यामध्ये कोणाला पाठीशी घातलं जात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संतप्त नागरिक आंदोलनाच्या तयारीत
दुषित पाण्यामुळे शेतीबरोबर नागरिकांनाही विविध आजाराला तोंड द्यावे लागत आहे. नदी दुषित करणार्या घटकांवर कारवाई व्हावी, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग यावी यासाठी पंचगंगा काठचे नागरिक वारंवार आंदोलन करत असतात. एक महिन्यापूर्वी आंदोलन करणार्या स्वाभिमानीच्या पाच जणांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला होता. हा प्रश्न विधानसभा व मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला. त्यामुळे आता तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कडक भूमिका घेईल व नदी प्रदूषणास काही अंशी आळा बसेल अशी आशा पंचगंगा काठच्या नागरिकांना होती. मात्र गेले दोन दिवस नदी पात्रात गटारीचे तसेच रसायनयुक्त सांडपाणी आले आहे. त्यामुळे शिरोळ बंधाऱ्यात हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. मासे मृत्यूमुखी पडण्याची ही दुसरी घटना घडल्याने संतप्त स्थानिक नागरिक आता पुन्हा तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.