कोल्हापूर- अनेक रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या रुग्णांपर्यंत ऑक्सिजन तातडीने कसे पोहोचेल या दृष्टीने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. या उपाययोजनाचा एक भाग म्हणून राज्यात ऑक्सिनजचा वाहतूक करणाऱ्या सर्व टँकर्सना आता रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. कोल्हापुरातही याची अंमलबजावणी केली जात असून जिल्ह्यातील ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. जिल्ह्यात असे सहा टँकर धावणार आहेत.
रुग्णवाहिकेप्रमाणे सर्व सुविधा
राज्यात कोरोनाचा आढावा घेतला तर येणाऱ्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू शकतो. त्यावर खबरदारी म्हणून या टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे रुग्णवाहिकेला असणाऱ्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. या टॅंकरला टोल माफी, सायरन, लाल दिवा तसेच अत्यावश्यक वाहतुकीचे परवानगी देण्यात आली आहे. तसेच वेग मर्यादेवर कोणतेही बंधन नसणार आहे.