कोल्हापूर - अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा संपली आहे. आज राज्यभरात कोरोना लसीकणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 प्रमाणे 1 हजार 100 लाभार्थ्यांना आज लस देण्यात येणार होती. मात्र जिल्ह्यात केवळ 52 टक्केच लसीकरण झाले आहे. म्हणजेच 1 हजार 100 पैकी केवळ 570 लाभार्थ्यांचेच लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे समुपदेशन करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी म्हंटले आहे.
कोल्हापूरमधील सेवा रुग्णालयात 86 टक्के लसीकरण
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 ठिकाणी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये शहरात 5 आणि जिल्ह्यातील विविध भागात 6 केंद्रांचा समावेश आहे. या प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे 1 हजार 100 लाभार्थ्यांना ही लस आज देण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात 570 लाभार्थ्यांनीच लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील 11 केंद्रांपैकी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात 100 पैकी 86 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.