कोल्हापूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोल्हापुरात आणखी एकाला कोरोनाची लागण झालेचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा-COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापुरात एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज (सोमवारी) सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी याबाबत माहिती दिली. कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 22 ते 28 मार्चला ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. 28 मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती.
महिलेला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे 30 मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी 31 मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. 3 एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरू असल्याचेही डॉ. साळे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, यापूर्वीच्या भक्तीपूजा नगर मधील दोन रुग्णांवर कोल्हापुरातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.