कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. या घोटाळ्याचा कोल्हापूर जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. फसवणूक झालेल्या प्रमोद जमदाडे (रा. माले, ता. पन्हाळा) या तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. प्रमोदच्या आत्महत्येला सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत जबाबदार आहे. म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
प्रमोद जमदाडे यांनी वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत अॅग्रोकडे अडीच लाख रुपये भरले होते. शिवाय त्यांना शेड आणि अन्य खर्च मिळून अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत अॅग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोदचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामुळे नैराश्यातून त्यांना 18 जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.